प्रसिद्ध तुर्की शेफ नुसर-एटने शेअर केले अर्जेंटिनाच्या खेळाडूंसोबतचे खास फोटो
एकता दर्शन : पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसलेल्या कतार देशातील दोहा शहरात दि. १८ रोजी पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना आणि फ्रांस यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सवर मात करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. हा सामना पाहण्यासाठी जगभरातून विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मैदानावर आपली हजेरी लावली होती, यामध्ये प्रसिद्ध तुर्की शेफ व रेस्टॉरेटर नुसर-एट हादेखील त्याच्या आवडीच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आला होता. अर्जेंटिनाच्या विजयानंतर नुसर-एटने मैदानावर जाऊन खेळाडूंसमवेत फोटो काढून समाज माध्यमावर शेअर केले.
जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक २०२२ स्पर्धेतील अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रांस यांच्यात खेळला गेला. यावेळी भारतासह जगभरातील विविध देशांमधील अनेक दिग्गज लोकांनी सामना पाहण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर हजेरी लावली होती. यामध्ये सिनेअभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता रणवीर सिंग, अहान शेट्टी, इब्राहिम अली खान, कार्तिक आर्यन, क्रिस गेल यांच्यासह प्रसिद्ध शेफ नुसर-एटचाही समावेश होता.

१९८३ मध्ये जन्मलेला नुसर-एट हा एक तुर्की आचारी व मनोरंजन करणारा रेस्टॉरेटर आहे. त्याची स्वतःची "नुसर-एट" नावाची आलिशान स्टीक हाऊसची साखळी असून तुर्की, ग्रीस, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया आदी ठिकाणी एकूण २२ पेक्षा जास्त शाखा आहेत. नुसरच्या रेस्टॉरंट साखळीचे नाव स्वतःच्या नावावरून आहे त्यामधील "एट" याचा अर्थ तुर्कीमध्ये "मांस" आहे.
नुसर-एट त्याच्या क्षेत्रातला मोठा सेलिब्रिटी आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज त्याचे चाहते आहेत. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर आता ४९ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या विविध प्रकारच्या मांसाहारी डिशचे व्हिडिओ व्हायरल झाले असून प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मूठभर मीठ शिंपडायची त्याची पद्धत प्रसिद्ध आहे.
